सावर्डे विद्यालयात १,००० वह्यांचे वाटप; २८५ विद्यार्थ्यांना लाभ
दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज – शशिकांत पावसकर
सावर्डे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुमारे ८१ हजार रुपयांच्या १,००० लाँग नोटबुक वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ विद्यालयातील २८५ होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांना झाला.
यावेळी बोलताना शिक्षणप्रेमी व दानशूर व्यक्तिमत्त्व शशिकांत पावसकर यांनी सांगितले की, कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन गेली पंधरा वर्षे सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. समाजपरिवर्तनासाठी प्रत्येक कुटुंबातील मुलाने शिक्षण घेणे आवश्यक असून दर्जेदार शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्वतःच्या आयुष्यात अनुभवलेल्या अडचणी इतर विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नयेत, या उदात्त हेतूने शशिकांत पावसकर आणि दीपक कोलवणकर यांनी हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी केलेल्या या मदतीबद्दल पालक व ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास शशिकांत पावसकर, दीपक कोलवणकर, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक कुलकर्णी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आवश्यक वह्या मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
प्रास्ताविकात प्राचार्य राजेंद्र वारे यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करून दात्यांचा हेतू सार्थ ठरविण्याचे आवाहन केले. तसेच अशा शिक्षणप्रेमी व दानशूर व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन इतरांना सहकार्य करण्याची वृत्ती जोपासण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अशोक शितोळे यांनी केले.
छायाचित्र ओळ : सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करताना शिक्षणप्रेमी शशिकांत पावसकर, दीपक कोळवणकर व प्राचार्य राजेंद्र वारे मान्यवर.
