रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून श्रावण महिन्यात ४७१ मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान

0
22

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून श्रावण महिन्यात ४७१ मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान—

१२,६६० महिला सेविकांचा उत्स्फूर्त सहभाग*

👉नाणीजधाम : जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने रामानंदाचार्य संप्रदायाच्या अखिल भारतीय महिला सेनेच्या वतीने १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्रासह इतर राज्यांतील ७४ जिल्ह्यांमध्ये मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या अभियानांतर्गत तब्बल ४७१ मंदिरांची व मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. या सेवाकार्यात १२,६६० महिला सेविकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत श्रमदान केले.
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महिला सेविकांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या अभियानातून दिला. स्वतःचा संसार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून सेवाकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी आपल्या शिष्यगणांना सातत्याने देत आहेत. त्याच प्रेरणेतून महिला सेविकांनी मंदिर आणि मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
या स्वच्छता अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये खेड तालुक्यातील सुकीवली देऊळवाडी येथील वाघजाई देवी मंदिर, संगमेश्वर येथील जाकमाता मंदिर, राजापूर तालुक्यातील नाटे येथील नवलादेवी मंदिर व नाटेश्वर मंदिर, चिपळूण तालुक्यातील वालोपे येथील झोलाई मंदिर, गुहागर तालुक्यातील चिखली येथील चंडिकाई मंदिर, तसेच रत्नागिरी शहरातील किल्ला भगवती मंदिराचा समावेश आहे.
या अभियानादरम्यान मंदिर परिसरातील वाढलेले गवत, कचरा, अनावश्यक झाडाझुडपे तसेच इतर अस्वच्छता दूर करण्यात आली. मंदिर परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्याबरोबरच मंदिराच्या गर्भगृहासह संपूर्ण परिसराची श्रद्धापूर्वक स्वच्छता करण्यात आली.
श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. भाविकांना प्रसन्न वातावरणात दर्शन घेता यावे, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here