सरस्वती कोचिंग क्लासेसचे अजित कदम यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान.’
मुंबई : चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील टेरव गावचे सुपुत्र तथा सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबईचे प्राचार्य व संचालक श्री. अजित आबाजीराव कदम यांची अभिजित मराठी भाषा सन्मान दिनी, महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनच्या (MCOA) वतीने पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या शुभहस्ते ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ (Education Excellence Award) प्रदान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रातील गेल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री अजित कदम यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये शैक्षणिक प्रगती, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेतली गेली.
शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी दादर (पूर्व), मुंबई येथील किंग जॉर्ज ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या MCOA शिक्षक दिन सोहळ्यात श्री. अजित कदम यांचा तसेच सरस्वती कोचिंग क्लासेसचा गौरव करण्यात आला.
श्री. अजित आबाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली सरस्वती कोचिंग क्लासेसने गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळात सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण व विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाच्या माध्यमातून मुंबईतील शैक्षणिक क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. संस्थेच्या विस्तारामागे श्री. कदम यांची दूरदृष्टी, अथक परिश्रम आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा महत्त्वाची ठरली आहे.
या पुरस्कारामुळे केवळ श्री. अजित कदम यांचाच नव्हे, तर सरस्वती कोचिंग क्लासेसच्या संपूर्ण परिवाराचा गौरव होत असून, संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
टेरव गावच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील या सुपुत्राच्या कार्याचा गौरव होत असल्याने टेरव, चिपळूण तसेच दसपटी विभागातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कुलस्वामिनी आई भवानी रामवरदायिनी- वाघजाई मातेच्या आशीर्वादाने त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला यापुढेही नवी ऊर्जा, यश आणि कीर्ती लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
