रत्नागिरीमुर्डी येथे ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम उत्साहात

मुर्डी येथे ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम उत्साहात

मुर्डी येथे ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम उत्साहात; अंगणवाडी परिसर स्वच्छता व शासकीय योजनांविषयी प्रबोधन
रत्नागिरी, (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत दापोली तालुक्यातील आंजर्ला बीटमधील मुर्डी येथील अंगणवाडीमध्ये ‘सेवा माझे योगदान’ हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि लोकसहभागातून राबविण्यात आला. या मोहिमेद्वारे अंगणवाडी केंद्र व परिसराची व्यापक स्वच्छता करण्यात येऊन विविध लोककल्याणकारी शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आली.
या उपक्रमांतर्गत अंगणवाडीतील वर्गखोली, शैक्षणिक साहित्य, खेळणी तसेच बाह्य परिसराची स्वच्छता करून संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. आवारातील अनावश्यक गवत व कचरा काढून संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यात आला. स्वच्छ व प्रसन्न वातावरणामुळे बालकांसाठी आनंददायी, सुरक्षित आणि निरोगी परिसंस्था निर्माण होण्यास मदत झाली आहे.
यावेळी उपस्थितांना ‘स्वच्छता हीच सेवा’ हा मूलमंत्र देण्यात आला. याप्रसंगी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पालकांच्या उपस्थितीत शासनाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री मातृवंदना योजना, महिला शेतकरी प्रमाणपत्र, एकल महिला योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच संजय गांधी निराधार योजना यांसारख्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या उपक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक व लाभार्थी अशा १५ जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सक्रिय योगदान दिले.

Breaking News