लांजा-राजापूरमधील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी आमदार किरण सामंत फील्डवर—
विविध स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करून घेतला समस्यांचा आढावा!
खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्थानकांच्या विकासाचा अहवाल सादर करणार-
👉🏻मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून विविध प्रस्तावांना मंजुरी मिळवण्यासाठी करणार पाठपुरावा.. आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनी दिला शब्द…
👉🏻लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी काल दिवसभर लांजा आणि राजापूर तालुक्यातील विविध रेल्वे स्थानकांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी रेल्वे प्रवाशांच्या समस्या, रेल्वे स्थानकांवरील अपुऱ्या सोयीसुविधा, रेल्वे गाड्यांचे थांबे, फलाटांची स्थिती तसेच स्थानिक नागरिकांच्या विविध मागण्यांचा सविस्तर आढावा घेतला.
खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाहणी दौरा करण्यात आला असून, या दौऱ्यात निदर्शनास आलेल्या समस्या आणि आवश्यक विकासकामांचा सविस्तर अहवाल खासदार नारायण राणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून संबंधित प्रस्तावांना मंजुरी मिळवून देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रवाशांच्या रास्त मागण्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केले.
👉🏻लांजा आणि राजापूर तालुक्यातील रेल्वे स्थानकांची पाहणी
या दौऱ्यामध्ये लांजा तालुक्यातील निवसर, आडवली, वेरवली आणि विलवडे, तर राजापूर तालुक्यातील सौंदळ आणि राजापूर रेल्वे स्थानकांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक स्थानकावरील सद्यस्थिती, प्रवाशांची संख्या, उपलब्ध सुविधा आणि भविष्यात आवश्यक असणाऱ्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
👉🏻रेल्वे गाड्यांचे थांबे आणि फलाटांच्या विकासाला प्राधान्य
मतदारसंघातील विविध रेल्वे स्थानकांवर आवश्यक एक्स्प्रेस आणि अन्य रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच फलाटांची दुरुस्ती, नवीन फलाटांची उभारणी, फलाटांचे सुशोभीकरण, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा आणि रेल्वे स्थानकांच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याबाबत आवश्यक सूचना करण्यात आल्या.
👉🏻स्थानकांकडे जाणारे रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे प्रश्न
रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या अप्रोच रोडची दुरुस्ती व सुधारणा, स्थानक परिसरातील साईटसंबंधित अडचणी, नियमित पाणीपुरवठा आणि परिसरातील स्वच्छता या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. प्रवाशांना स्थानकापर्यंत सहज आणि सुरक्षितपणे पोहोचता यावे, यासाठी रस्त्यांच्या विकासाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
👉🏻तिकीट आरक्षण, प्रतीक्षालय आणि रिक्षाचालकांसाठी निवारा शेड
प्रवाशांना तिकीट आरक्षणाची सुविधा, आवश्यक रेल्वे कोटा, सुसज्ज प्रतीक्षालय आणि स्थानकांवर बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र निवारा शेड उभारणे, स्थानक परिसरात स्वच्छतागृहांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करणे या मागण्यांचाही विचार करण्यात आला.
👉🏻प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, रोजगार आणि भूसंपादनाचा आढावा
रेल्वे प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणी, प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारासंबंधीचे प्रश्न आणि भूसंपादनासंदर्भातील प्रलंबित बाबी यांचाही आढावा घेण्यात आला. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा आणि रोजगाराच्या संधींबाबत योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची भूमिका मांडण्यात आली.
👉🏻पादचारी पूल आणि एस.टी. बससेवा उपलब्ध करण्याबाबत सूचना
रेल्वे रूळ ओलांडताना प्रवाशांना होणारा त्रास आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता आवश्यक त्या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच रेल्वेने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना गावापर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे स्थानकांच्या वेळापत्रकानुसार एस.टी. बससेवेची उपलब्धता आणि योग्य वाहतूक नियोजन करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.
👉🏻महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांकडे विशेष लक्ष
रेल्वे स्थानकांवर महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे आमदारांनी नमूद केले. सुरक्षित प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, बसण्याची व्यवस्था, सुरक्षित ये-जा आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
रेल्वे प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन त्या प्रत्यक्ष सोडविण्याच्या दृष्टीने हा पाहणी दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दौऱ्यात समोर आलेल्या सर्व समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवून संबंधित रेल्वे प्रशासन आणि शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री उदय सामंत आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून या विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी भूमिका आमदार किरण सामंत यांनी यावेळी मांडली.
लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, स्थानिक रेल्वे स्थानकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता व्हावी, या उद्देशाने हा पाहणी दौरा करण्यात आला.
