सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघ व युनिटेक कम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी (ता. गुहागर) यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सिक्युरिटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या विषयांवरील माहितीपर परीक्षा यशस्वीपणे पार पडली.
सद्यस्थितीत वाढत चाललेल्या डिजिटल वापराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण करणे, सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर कसा करावा याची जाणीव करून देणे, तसेच सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, डेटा चोरी यांसारख्या संभाव्य धोक्यांविषयी माहिती देणे हा या परीक्षेचा मुख्य उद्देश होता. यासोबतच आधुनिक काळातील महत्त्वाचे क्षेत्र असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
या परीक्षेत इयत्ता नववीचे 184 विद्यार्थी आणि इयत्ता अकरावीचे 319 विद्यार्थी अशा एकूण 503 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी परीक्षेद्वारे सायबर सिक्युरिटीचे नियम, सुरक्षित पासवर्ड वापर, सोशल मीडियावरील गोपनीयता, तसेच एआय तंत्रज्ञानाचे उपयोग आणि भविष्यातील संधी याबाबत उपयुक्त माहिती आत्मसात केली.
परीक्षेचे नियोजन व अंमलबजावणी परीक्षा समन्वयक संचिता कदम व श्रीमती शिल्पा जाधव यांनी प्रभावीपणे पार पाडली. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उपक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाचा सकारात्मक, सुरक्षित आणि अभ्यासपूर्ण वापर करण्याची जाणीव निर्माण झाली असून भविष्यातील डिजिटल आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ते अधिक सज्ज होतील, असा विश्वास विद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.
