रत्नागिरीसह्याद्री क्रीडासंग्रामाचे दमदार उद्घाटनशालेय स्पर्धेतून राष्ट्रीय खेळाडू घडावेत – आमदार शेखर निकम

सह्याद्री क्रीडासंग्रामाचे दमदार उद्घाटनशालेय स्पर्धेतून राष्ट्रीय खेळाडू घडावेत – आमदार शेखर निकम

सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था अंतर्गत आयोजित क्रीडासंग्राम (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गट) स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटन समारंभात संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच चिपळूण–संगमेश्वरचे आमदार शेखरजी निकम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व ध्वजारोहण करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त मारुतीराव घाग, शांताराम खानविलकर, सचिव महेश जी महाडिक क्रीडा प्रबोधिनीचे प्रमुख अनिरुद्ध निकम, सावर्डे गावचे प्रतिष्ठित नागरिक विजय भुवड, संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक तसेच १२६५ खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी सावर्डे, टाळसुरे व असुर्डे विद्यालयातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या शुभहस्ते क्रीडा ज्योतीचे परिभ्रमण करण्यात आले. यामुळे क्रीडासंग्रामाला प्रेरणादायी वातावरण लाभले.
आ. शेखरजी निकम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “सह्याद्री शिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या क्रीडा सुविधांचा खेळाडूंनी योग्य वापर करून कठोर सराव करावा. ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचावेत, हे सह्याद्रीचे स्वप्न असून त्यांच्या क्रीडा प्रगतीसाठी संस्था नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभी राहील.” क्रीडा स्पर्धांमधून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू सह्याद्रीने घडविले आहेत त्याच्यामध्ये सतत भर पडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या संस्थांतर्गत क्रीडा स्पर्धेत ६ प्राथमिक शाळा, २२ माध्यमिक विद्यालये व ५ उच्च माध्यमिक विद्यालयांचा सहभाग आहे. संस्थेचे क्रीडा विभाग प्रमुख उदयऱाज कळंबे यांनी केलेल्या नियोजनानुसार या स्पर्धा आजपासून तीन दिवस चालणार असून, विविध शाखांमधून राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडूही सहभाग घेणार आहेत.
क्रीडासंग्रामाच्या उद्घाटनाने परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून, खेळाडूंच्या उत्साहाने स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे.

Breaking News