रत्नागिरी, (जिमाका):- बदलत्या हवामानामुळे किड व रोगांचा आंबा फळपिकांवर प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्याअनुषंगाने कृषि विभाग व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने 31 डिसेंबर रोजी जिल्ह्यामध्ये तज्ञ शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी व आंबा उत्पादक शेतकरी यांचे समवेत जिल्हयातील पहिला ऑनलाइन वेबिनार पार पडला. वेबिनारचे अध्यक्षस्थान विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग ठाणे यांनी भूषवले.
सदरील ऑनलाइन वेबिनार मध्ये संशोधन उपसंचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली डॉ. जालगावकर, कनिष्ठ किटक शास्रज्ञ प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये डॉ. वानखेडे, कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ कृषि किटकशास्त्र विभाग डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली डॉ. मुळे, व सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली डॉ. पोटफोडे इत्यादी शास्त्रज्ञ उपस्थित होते.
या ऑनलाईन वेबीनार मध्ये शेतक-यांना आंबा मोहर संरक्षण तसेच आंबा फुलकिड व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव कमी करण्याबद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित आंबा उत्पादक शेतक-यांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन विद्यापीठ शास्त्रज्ञ यांच्याकडून करण्यात आले. अशा प्रकारचे वेबिनार जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दर महिन्याच्या दुस-या व चौथ्या बुधवारी सांयकाळी 6 वाजता आयोजित केले जाणार आहेत. सदरील वेबिनारची लिंक (बेबीनार ग्रुप लिंक:- https://chat.whatsapp.com/HFm0KF4AVIDELTvy0i0cH3) व्हॉटसप ग्रुपद्वारे पाठविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृषि सेवक, सहाय्यक कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतक-यांनी या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
