एकीकडे शासन झाडे लावा.झाडे जगवा चा संदेश देत जनजागृती करीत आहे.परंतु हाच शासनाचा आदेश वनविभाग मात्र पायदळी तुडवत असल्याचे दिसून येत आहे.त्याचे मुख्य कारण म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील आठवडा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचा साठा खुलेआम ठेवण्यात आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
आठवडा बाजारालगत असलेल्या भिडे यांच्या जुन्या वखारीजवळही सागवान लाकडाचे ढीग साठवून ठेवण्यात आले असून, हे सर्व लाकूड विना परवाना असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे माभळे आणि मासरंग परिसरात विना परवाना सागवान वृक्षांची तोड झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये असून, त्याच लाकडाचा साठा येथे आणला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागाकडून अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या संदर्भात संगमेश्वरचे वनपाल सागर गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता, “आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नाही,” असे त्यांनी सांगितले. मात्र आज रात्री लाकडाची गाडी भरण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतरही “मी उद्या पाहतो,” असे उत्तर देण्यात आले. सध्या आपण वन्यप्राणी गणनेच्या कामात व्यस्त असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, “उद्या पाहणी करण्यापूर्वीच जर रात्री हा साठा अन्यत्र हलवण्यात आला, तर त्याची जबाबदारी कोणाची?” असा थेट सवाल विचारण्यात आला असता, त्यावरही केवळ “उद्या पाहतो,” एवढेच उत्तर देण्यात आले. त्यामुळे अवैध सागवान तोड व वाहतुकीला वन विभागाकडून अप्रत्यक्ष वरदहस्त मिळत असल्याचा आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे.
व्यापाऱ्यांची उद्धट वर्तणूक आणि वनखात्याचे दुर्लक्ष यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, विना परवाना सागवान तोड व साठ्यावर तात्काळ कारवाई होणार का, असा थेट सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. वन विभाग यावर ठोस पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
