रत्नागिरी :राजापूर–लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा बॅ. नाथ पै पुरस्कार यावर्षी लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांना जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन आणि निस्वार्थ कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.
राजापूर–लांजा तालुका नागरिक संघ ही संस्था सन १९५३ पासून राजापूर व लांजा तालुक्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच भौतिक विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. सन २०२४ पासून संघाच्या पुरस्कार निवड समितीमार्फत कोकणाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील कर्तबगार व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा गौरव करण्यात येतो.
अभिजीत हेगशेट्ये यांनी गेली अनेक वर्षे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. मातृमंदिर संस्था, नवनिर्माण शिक्षण संस्था तसेच इतर सामाजिक संस्थाच्या माध्यमातून अभिजित हेगशेट्ये यांनी प्रामाणिकपणे कार्य करून बहुजन वर्गाला न्याय मिळवून देण्याचे काम केले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांची प्रयोगशीलता, सर्जनशीलता ऊर्जा देणारी ठरली आहे. साहित्य क्षेत्रातही त्याचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान व गौरव करण्याच्या उद्देशाने त्यांची बॅ. नाथ पै पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे संघाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
यावर्षीचे ११ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन राजापूर तालुक्यातील रिंगणे येथे दि. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत, संपादक, माजी खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते अभिजीत हेगशेट्ये यांना बॅ. नाथ पै पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
