कोकण विभागात बोर्डाची पुरवणी परीक्षा कडक शिस्तीत सुरू; पहिल्या दोन दिवसांत एकही...

कोकण विभागात बोर्डाची पुरवणी परीक्षा कडक शिस्तीत सुरू; पहिल्या दोन दिवसांत एकही गैरप्रकार नाही

कोकण विभागात बोर्डाची पुरवणी परीक्षा कडक शिस्तीत सुरू; पहिल्या दोन दिवसांत एकही गैरप्रकार नाही

विभागीय अध्यक्षांकडून रत्नागिरीतील गोगटे महाविद्यालय आणि फाटक हायस्कूल केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळांतर्गत घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या जून-जुलै २०२६ च्या पुरवणी परीक्षांना मंगळवारपासून कडक शिस्तीत प्रारंभ झाला आहे. शासनाच्या ‘कॉपीमुक्त’ धोरणाची जिल्ह्यात अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असून, पहिल्या दोन दिवसात संपूर्ण कोकण विभागातील कोणत्याही परीक्षा केंद्रावर एकाही गैरप्रकारची नोंद झालेली नाही.

विभागीय अध्यक्षांच्या भेटी-
परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वतः रत्नागिरी येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी रत्नागिरीतील नामांकित गोगटे महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षा केंद्रास, तर त्यानंतर फाटक हायस्कूलमधील दहावीच्या परीक्षा केंद्रास भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा उपकेंद्रातील सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था आणि सीसीटीव्ही प्रणालीचा आढावा घेतला. केंद्रचालक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, जरी पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थी आणि केंद्रांची संख्या नियमित परीक्षेच्या तुलनेत कमी असली, तरीही परीक्षेची विश्वासार्हता आणि कडक शिस्त राखण्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

‘सीसीटीव्ही’ची नजर आणि भरारी पथकांची नियुक्ती

परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य मंडळाच्या निर्देशानुसार विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर आणि थेट वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले असून या सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवण्याच्या कडक सूचना शाळा व महाविद्यालय प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाने ४ विशेष भरारी पथके तैनात केली असून, ही पथके संपूर्ण परीक्षा कालावधीत सर्व केंद्रांवर अचानक भेटी देऊन करडी नजर ठेवत आहेत. तसेच, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय दक्षता समितीही परीक्षा कामकाजावर बारीक लक्ष ठेवून आहे.

परीक्षा आणि परीक्षार्थी संख्या तपशील-

या शैक्षणिक वर्षातील पुरवणी परीक्षेअंतर्गत इयत्ता १० वीची लेखी परीक्षा १६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत, तर इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा १६ जून ते ८ जुलै २०२६ या कालावधीत पार पडत आहे. कोकण विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. या दोन्ही जिल्ह्यांत मिळून एकूण ११ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७ परीक्षा केंद्रे असून, त्यात १० वीसाठी ४ केंद्रे आणि १२ वीसाठी ३ केंद्रे समाविष्ट आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४ परीक्षा केंद्रे असून, त्यात १० वीसाठी २ केंद्रे आणि १२ वीसाठी २ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

१० जून २०२६ पर्यंतच्या नोंदणीनुसार, संपूर्ण कोकण विभागातून एकूण ९८९ विद्यार्थी या पुरवणी परीक्षेला बसले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७३५ परीक्षार्थी असून, त्यात १० वीचे १९० आणि १२ वीच्या ५४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २५४ परीक्षार्थी परीक्षा देत असून, यामध्ये १० वीसाठी ९४ आणि १२ वीसाठी १६० विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

विद्यार्थ्यांना डिजिटल मार्गदर्शनाचा आधार-

विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षेचे नियोजन सुलभ व्हावे, यासाठी विभागीय मंडळाने ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ ही विशेष मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या विषयांचे घरबसल्या मार्गदर्शन मिळावे यासाठी मंडळाने यूट्यूबवर मार्गदर्शनपर व्हिडिओ देखील उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती विभागीय सचिव पुनिता गुरव आणि अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

दरम्यान, परीक्षेच्या कालावधीत केंद्रांवर किंवा परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित कर्मचारी आणि केंद्रांवर तत्काळ कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय मंडळाने दिला आहे.

Breaking News

सिंचन भवन: पूर नियंत्रण कक्ष सन 2026 धरण व नद्यांचा पाऊस व पाणीपातळी अहवाल

जलसंपदा विभाग़रत्नागिरी पाटबंधारे मंडळकुवारबाव- रत्नागिरीसिंचन भवन: पूर नियंत्रण कक्ष...

विलास महाडिक यांना ‘लोकप्रेरणा’ कोकण गौरव पुरस्कार

विलास महाडिक यांना ‘लोकप्रेरणा’ कोकण गौरव पुरस्कार चिपळूण :: येथील...