विद्युत मंडळाचा हलगर्जीपणा; पावस येथे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू
पावस (रत्नागिरी) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळामार्फत पावस येथे भूमिगत वीज केबल टाकण्याचे काम सुरू असून संबंधित विभाग व रस्ता काँक्रीटीकरण करणारे ठेकेदार यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.
पावस येथील पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याजवळ केवळ डीपी बसवून केबल जोडणीचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. तसेच रस्त्यावर केबल उघड्या अवस्थेत टाकून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. परिसरात निवासी घरेही असल्याने मोठ्या आर्थिक व जीवितहानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत संबंधित ठेकेदारांना वारंवार सूचना देऊनही “लवकरच काम पूर्ण करू” अशी उत्तरे देत कामाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शेजारीच पोलीस ठाणे असतानाही संबंधित ठेकेदारांकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यापूर्वी अथवा तातडीने हे काम पूर्ण न झाल्यास भविष्यात मोठा अपघात घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
विद्युत मंडळाचा हलगर्जीपणा; पावस येथे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू
