एम. एस. नाईक इंग्लिश मीडियम हायस्कूल, रत्नागिरी येथे हिफ्ज सूरह व कुरआन पठण स्पर्धेचे यशस्वी आयोजन–
👉रत्नागिरी- (प्रतिनिधी): एम. एस. नाईक इंग्लिश मीडियम हायस्कूल, रत्नागिरी येथे “हिफ्ज सूरह व कुरआन पठण स्पर्धेचे” भव्य, अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी आयोजन करण्यात आले. होते.या कार्यक्रमात सुमारे ६० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्साहाने आणि उत्कृष्ट तयारीसह सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सहावीतील विद्यार्थी हस्सान सिद्दीकी यांनी सुरह अल-कद्रच्या पवित्र पठणाने केली. त्यानंतर त्याच इयत्तेतील अदीब सोलकर यांनी त्या सुरेचा इंग्रजी अनुवाद सादर केला. पुढे इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी हम्द सादर करून कार्यक्रमात आध्यात्मिक वातावरण निर्माण केले. त्यानंतर इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी अजमीन अजीम हिने आपल्या मधुर आवाजात नात-ए-रसूल ﷺ सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. अशफाक नाईक होते. तर हाफिज व कारी अब्दुल कुद्दूस, मकतब व मदरसा तसहीहुल कुरआनचे प्रमुख, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी हम्द, नात, कविता, भाषणे, हिफ्ज सूरह स्पर्धा, कुरआन पठण, तहतुल लफ्ज कविता सादरीकरण तसेच इतर शैक्षणिक व साहित्यिक उपक्रमांमधून आपल्या सुप्त कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्या सादरीकरणाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व आयोजनात इस्लामिक स्टडीज विभागातील मौलाना मुहम्मद जकी कासमी, मौलाना उसामा हज्जो नदवी, हाफिज शब्बीर हज्जो आणि श्री. सिद्दीक बारगीर यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी फातिमा अल्ताफ झारी आणि आफीन रिजवान कादरी यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी शैलीत केले.
प्रमुख पाहुणे हाफिज व कारी अब्दुल कुद्दूस यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांना पवित्र कुरआनशी अधिक दृढ नाते जोडण्याचे आवाहन केले. तसेच शाळा व्यवस्थापनाचे अशा अर्थपूर्ण आणि यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. नौमान नाईक यांच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे आणि आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी इस्लामिक स्टडीज विभागाचे शिक्षक मौलाना मुहम्मद जकी कासमी यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचे आभार मानले. श्री. सिद्दीक बारगीर यांच्या भावपूर्ण दुआने कार्यक्रमाची सांगता झाली.
एम. एस. नाईक इंग्लिश मीडियम हायस्कूल, रत्नागिरी येथे हिफ्ज सूरह व कुरआन पठण स्पर्धेचे यशस्वी आयोजन
