लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी
रत्नागिरी, (वार्ताहर) : एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, रत्नागिरी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “देशप्रेम म्हणजे काय?” या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी नाटिका सादर करून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. नोमान नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकीब काझी, शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आरिफा म्हालदार तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक या मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्ती, शिक्षणप्रेम, स्वाभिमान आणि सामाजिक कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारावा, असे सांगितले. देशप्रेम, शिस्त, प्रामाणिकपणा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जोपासून सुजाण, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक बनण्याचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये आत्मसात करून देशाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही मान्यवरांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
