🔴“वृक्षवल्ली आम्हा सोयरे…”च्या संदेशातून वनमहोत्सवात वृक्षसंवर्धनाचा जागर
🔴दाभोळे संगमेश्वर येथे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते वृक्षारोपण
🔴वनमहोत्सवानिमित्त वन विभाग रत्नागिरी (चिपळूण विभाग) आणि शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, संगमेश्वर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण
संगमेश्वर, प्रतिनिधी :
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा जागर करत वनमहोत्सवानिमित्त वन विभाग रत्नागिरी (चिपळूण विभाग) आणि शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, संगमेश्वर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आमदार किरण (भैय्या) सामंत व अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प केला.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी सांगितले की, वाढते प्रदूषण, हवामान बदल, जंगलतोड आणि पाण्याची टंचाई या गंभीर समस्यांवर वृक्षलागवड हा प्रभावी उपाय आहे. वृक्ष केवळ प्राणवायू देत नाहीत, तर पाऊस, जलसंधारण, मृदसंवर्धन आणि वन्यजीवांचे संरक्षण यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे वृक्ष लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वनमहोत्सवाचे महत्त्व स्पष्ट करताना शासनाच्या विविध वृक्षलागवड योजनांची माहिती दिली आणि शेतकरी, विद्यार्थी, युवक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, संगमेश्वर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतीबरोबरच साग, बांबू, काजू, आंबा व इतर उपयुक्त वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनासह आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी “झाड लावूया, झाड जगवूया” हा संकल्प करत पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याची ग्वाही दिली. वनमहोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून तो जनआंदोलन बनविण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके,DFO गिरिजा देसाई,ACF प्रियांका लडग, माजी सभापती जया माने, बापू शेटे विलास बेर्डे,RFO विक्रम गुरव, रजनी चिंगळे, राजू कुरूप,लक्ष्मण कदम सागर गोसावी ,राजेश रेवाळे बापू शिंदे,राजेश कामेरकर, काशिनाथ सकपाळ, किरण जाधव मीवन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
