आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्याकडून करक धरणाची पाहणी
पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचना
, पाचल; राजापूर :-
लांजा-राजापूर मतदारसंघातील करक धरण परिसराची आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी प्रत्यक्ष पाहणी करून धरणातील पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग तसेच परिसरातील परिस्थितीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. धरण परिसरावर सातत्याने लक्ष ठेवावे, पाण्याच्या पातळीवर नियमित निरीक्षण करावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी धरण परिसरातील सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन यंत्रणांची तयारी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. कोणतीही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी नागरिकांना केले.
