रत्नागिरीक्षयरोगमुक्त रत्नागिरीसाठी ‘निश्चय मित्र’ फिनोलेक्स कंपनीचा सामाजिक सहभाग

क्षयरोगमुक्त रत्नागिरीसाठी ‘निश्चय मित्र’ फिनोलेक्स कंपनीचा सामाजिक सहभाग

क्षयरोगमुक्त रत्नागिरीसाठी ‘निश्चय मित्र’ फिनोलेक्स कंपनीचा सामाजिक सहभाग

♦️उपचाराखालील क्षयरुग्णांना फूड बास्केट किटचे वाटप

रत्नागिरी :- क्षयरोगमुक्त रत्नागिरीच्या दिशेने वाटचाल करताना उपचाराखालील क्षयरुग्णांना पोषणाचा आधार मिळावा, यासाठी जिल्हा आरोग्य विभाग व फिनोलेक्स कंपनी, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात ‘निश्चय मित्र’ उपक्रमांतर्गत फूड बास्केट किटचे वाटप करण्यात आले.

फिनोलेक्स कंपनी, रत्नागिरी मागील दोन वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत राजापूर तालुक्यातील उपचाराखालील क्षयरुग्णांना दरमहा फूड बास्केट किट उपलब्ध करून देत आहे. याच उपक्रमांतर्गत आज दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी फिनोलेक्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी श्री. निंबाळकर व त्यांचे सहाय्यक श्री. रेवाळे यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र ओणी, ग्रामीण रुग्णालय राजापूर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे येथील उपचाराखालील क्षयरुग्णांना फूड बास्केट किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हास्तरावरून श्री. श्रीकांत सावंत, प्राथमिक आरोग्य केंद्र ओणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ मदने व कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय राजापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मिस्त्री व सर्व कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माने व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राजापूर कार्यक्षेत्रातील उपचाराखालील क्षयरुग्णही उपस्थित होते.

‘निश्चय मित्र’ उपक्रमातून मिळणारा पोषणाचा आधार रुग्णांच्या उपचार प्रक्रियेला बळ देणारा असून, फिनोलेक्स कंपनीने गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने केलेले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. कार्यक्रमावेळी काही उपचाराखालील रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त करून फिनोलेक्स कंपनीचे आभार मानले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोगमुक्त रत्नागिरीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. क्षयरोगाचे वेळेत निदान, नियमित व पूर्ण उपचार, रुग्णांना पोषणात्मक आधार तसेच समाजातील विविध घटकांचा सहभाग या माध्यमातून क्षयरोग नियंत्रणाच्या कार्याला अधिक गती देण्यात येत आहे.

क्षयरुग्णांना केवळ औषधोपचार नव्हे, तर पोषण, मानसिक आधार आणि सामाजिक सहकार्य मिळणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून ‘निश्चय मित्र’ म्हणून फिनोलेक्स कंपनीकडून सुरू असलेला उपक्रम हा क्षयरोगमुक्त भारताच्या संकल्पनेला हातभार लावणारा ठरत आहे.

“समाजाच्या सहभागातूनच क्षयरोगमुक्त रत्नागिरीचा संकल्प साकार होईल,” असा विश्वास जिल्हा आरोग्य विभागाने व्यक्त केला.

Breaking News