आर एच पी फाउंडेशनच्या सहकार्यातून दिव्यांग मारुती गणपत ढेपसे यांना निओ मोशन व्हीलचेअर इलेक्ट्रिक गाडी मिळाली–
👉श्री. मारुती गणपत ढेपसे, वय ५६ वर्षे, राहणार नेवरे, तालुका. जिल्हा. रत्नागिरी. शिक्षण दहावीपर्यंत. आई-वडील शेतीचे काम करायचे. त्यांना एक विवाहित बहीण आहे.
दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मारुती ढेपसे यांनी कोतवडे येथे स्वतःचे टू-व्हीलर रिपेअरिंग गॅरेज सुरू केले. कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय उभा केला आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास सुरुवात केली. सन १९९८ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगी असून ती विवाहित आहे, तर मुलगा शुभम ढेपसे सध्या गॅरेजचा व्यवसाय सांभाळत आहे.
गॅरेजमध्ये काम करत असताना जड वस्तू उचलल्यामुळे मारुती यांच्या उजव्या पायात कमजोरी जाणवू लागली. सन २००४ पासून हळूहळू पायातील ताकद कमी होत गेली. अखेर २०१२ मध्ये लघवी करत असताना अचानक दोन्ही पायातील पूर्ण ताकद गेली आणि पाय लुळे पडले. कमरेपासून खालच्या भागातील संवेदना कमी झाल्या तसेच लघवी व शौचावरील नियंत्रणही गेले.
चालता येणे पूर्णपणे बंद झाल्याने ते बेडवरच राहू लागले. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कामासाठी पत्नीवर अवलंबून राहावे लागत होते. मिरज येथे फिजिओथेरपीसाठी उपचार घेतले; मात्र अपेक्षित सुधारणा झाली नाही.
सन २०१५ मध्ये आरएचपी फाउंडेशन, रत्नागिरीचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. मारुती ढेपसे यांची परिस्थिती समजून घेतल्यानंतर संस्थेतर्फे त्यांना व्हीलचेअर देण्यात आली. तसेच मुंबई येथील हाजी अली हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर पत्नीला सोबत घेऊन ते सुमारे पाच महिने मुंबईतील हाजी अली येथे उपचारासाठी राहिले. तेथे हॉस्पिटल तर्फेही त्यांना व्हीलचेअर मिळाली. व्हीलचेअरच्या साहाय्याने ते बाहेर पडू लागले, इतरांशी संवाद साधू लागले आणि त्यांच्या मानसिक स्थितीतही सकारात्मक बदल होऊ लागला.
हाजी अली येथे त्यांनी बेडवरून व्हीलचेअरवर, व्हीलचेअरवरून कमोडवर स्वतः शिफ्ट होणे, स्वतः अंघोळ करणे आणि दैनंदिन कामे स्वतः करण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे त्यांच्यात स्वावलंबनाचा आत्मविश्वास निर्माण झाला.
या काळात त्यांना बेडसोरची समस्याही निर्माण झाली. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पाच महिन्यांच्या उपचारानंतर ते पुन्हा आपल्या घरी परतले.
घरी आल्यानंतर हळूहळू व्हीलचेअरच्या साहाय्याने ते गॅरेजमध्ये जाऊन बसू लागले. मुलगा शुभम गॅरेजचे काम पाहू लागला आणि मारुती त्याच्या कामावर लक्ष ठेवू लागले. परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी पुन्हा आपल्या व्यवसायाशी नाते जोडले.
मात्र सतत व्हीलचेअरवर बसून राहिल्याने सन २०२५ मध्ये पुन्हा सीटच्या भागात दोन बेडसोर झाले. दररोज ड्रेसिंग करूनही जखमा बऱ्या होत नसल्याने फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
या परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाता यावे, शरीरावर अतिरिक्त दबाव पडू नये आणि भविष्यात जखमा होण्याचा धोका कमी व्हावा, यासाठी त्यांना अधिक सोयीची इलेक्ट्रिक व्हीलचेअर अत्यंत गरजेची होती.
वयाची अडचण आली; मात्र गरज पाहून आरएचपी फाउंडेशनने घेतली जबाबदारी
मारुती ढेपसे यांची गरज लक्षात घेऊन आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी त्यांचे नाव निओमोशन इलेक्ट्रिक व्हीलचेअरसाठी सुचविले. मात्र वयोमर्यादेमुळे त्यांची अधिकृत निवड होऊ शकली नाही.
परंतु केवळ वयाची अडचण म्हणून गरजू व्यक्तीला मदतीपासून वंचित ठेवायचे नाही, या भावनेतून त्यांच्या परिस्थितीची आणि निओमोशन इलेक्ट्रिक व्हीलचेअरची असलेली अत्यावश्यक गरज लक्षात घेऊन आरएचपी फाउंडेशनच्या माध्यमातून देणगीदाराच्या सहकार्याने मारुती ढेपसे यांना निओमोशन इलेक्ट्रिक व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली.
ही मदत त्यांच्या आयुष्यातील स्वावलंबनाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
निओमोशन इलेक्ट्रिक व्हीलचेअरच्या माध्यमातून आता त्यांना घराबाहेर पडणे, गॅरेजमध्ये जाणे, मुलाच्या कामावर लक्ष ठेवणे तसेच इतरांशी संवाद साधणे अधिक सुलभ होणार आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून आर्थिक पुनर्वसनाच्या दिशेने पुन्हा प्रयत्न करण्यास नवी ऊर्जा मिळणार आहे.
निओमोशन इलेक्ट्रिक व्हीलचेअर प्रदान करताना आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, मारुती ढेपसे, मयुरी ढेपसे, शिवन्या ढेपसे, शुभम ढेपसे, स्वराज ढेपसे आणि श्रीजा ढेपसे उपस्थित होते.
अपंगत्वामुळे आयुष्य थांबत नाही; योग्य आधार, साधने आणि आत्मविश्वास मिळाला तर स्वावलंबनाची नवी वाट निर्माण करता येते. मारुती ढेपसे यांची संघर्षमय वाटचाल आणि निओमोशन इलेक्ट्रिक व्हीलचेअरच्या माध्यमातून मिळालेली नवी दिशा ही त्याचेच प्रेरणादायी उदाहरण आहे.
