डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपने सोपवली नवीन जबाबदारी–
भाजप महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी केली नियुक्ती–
👉🏻रत्नागिरी:- राजकारणात पदापेक्षा कार्याला आणि प्रसिद्धीपेक्षा जनसंपर्काला महत्त्व देत संघटनात्मक वाटचाल करणारे रत्नागिरीतील युवा नेतृत्व डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाने नवी महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही निवड केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून आनंद व्यक्त होत आहे.
सामान्य कार्यकर्त्यापासून संघटनेतील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत पुढे आलेले डॉ. केळकर यांचा राजकीय प्रवास हा सातत्यपूर्ण कामाचा आणि जनसंपर्काचा आहे. बूथ प्रमुख म्हणून कामाची सुरुवात केल्यानंतर त्यांनी भाजप युवा मोर्चाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष तसेच भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशा विविध पदांवर जबाबदारी पार पाडली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि स्थानिक पातळीवरील प्रश्नांची जाण ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये मानली जातात.
राजकीय कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. युवक-युवती, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील गरजू रुग्णांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू नागरिकांना शासकीय योजना, वैद्यकीय सुविधा आणि विविध मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. सामाजिक प्रश्नांकडे केवळ पाहण्याऐवजी त्यावर प्रत्यक्ष काम करण्याची त्यांची भूमिका त्यांच्या कार्यातून दिसून येते.
त्यांच्या सामाजिक आणि युवक क्षेत्रातील कार्याची दखल घेत भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत ‘माय भारत’ या स्वायत्त संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शासकीय सल्लागार समितीवर त्यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली आहे. प्रदेश पातळीवरील भाजपची नवी जबाबदारी आणि केंद्र सरकारच्या संस्थेवरील ही नियुक्ती त्यांच्या कार्याची व्याप्ती अधोरेखित करणारी आहे.
डॉ. केळकर यांना सामाजिक आणि सार्वजनिक कार्याचा वारसा लाभला आहे. रत्नागिरीचे पहिले थेट निवडून आलेले नगराध्यक्ष आणि सुमारे १२ वर्षे नगराध्यक्षपद भूषवलेले डॉ. ज. शं. केळकर यांचे ते नातू आहेत. मात्र, या वारशासोबतच स्वतःच्या कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध घटकांशी असलेला त्यांचा संपर्क ही त्यांच्या जमेची बाजू आहे.
नव्या जबाबदारीबाबत बोलताना वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, आरोग्यसेवक आणि संबंधित घटकांना पक्षाच्या संघटनात्मक प्रवाहाशी अधिक प्रभावीपणे जोडण्याचा, वैद्यकीय आघाडीची प्रदेशभर मजबूत बांधणी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. संघटनात्मक अनुभवाला सामाजिक जाणिवेची जोड देत वैद्यकीय क्षेत्रातील प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या नियुक्तीबद्दल डॉ.केळकर यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्विय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांचे देखील विशेष आभार मानले आहेत.
रत्नागिरीच्या मातीतून घडलेले युवा नेतृत्व आता प्रदेश पातळीवर नवी जबाबदारी सांभाळणार आहे. पक्षसंघटनेतील अनुभव, समाजासाठी काम करण्याची तळमळ आणि युवकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची ऊर्जा यांच्या बळावर डॉ. ऋषिकेश केळकर यांची ही नवी राजकीय वाटचाल निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे
