सावर्डे विद्यालयातील २२५ विद्यार्थ्यांना चार लाखांचे आयडियल स्टडी ॲप*–
“*मेहनत घ्या, यश मिळवा!” — सोनाली रहाटे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
👉🏻सावर्डे (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ लोटे आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या २२५ विद्यार्थ्यांना सुमारे चार लाख रुपये किमतीच्या आयडियल स्टडी ॲपचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ लोटेच्या अध्यक्षा सोनाली रहाटे, पास्ट प्रेसिडेंट सुभाष रहाटे, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचे पास्ट प्रेसिडेंट नितीन बांदेकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लिटरसी चेअरमन वर्षा बांदेकर, अमोल कामत, वंदना कामत, आयडियल स्टडी डेव्हलपर्सचे प्रतिनिधी, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहन सोनाली रहाटे यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची आवड निर्माण करणे, विषयांचे आकलन वाढविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक सुलभ व परिणामकारक करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अमोल कामत यांनी विविध उदाहरणांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नियमित अभ्यास, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळविणे शक्य आहे, असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. नितीन बांदेकर यांनी मोबाईलचा वापर करताना विद्यार्थ्यांनी पालकांच्या देखरेखीखालीच त्याचा उपयोग करावा, असे आवाहन केले. रोटरी क्लब ऑफ लोटे व डोंबिवली सिटी यांनी आयडियल स्टडी ॲप दिल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी कृतज्ञता व्यक्त केली व आपणास प्राप्त झालेल्या मौलिक साधनांच्या माध्यमातून शैक्षणिक व गुणवत्ता पूर्ण प्रगती करावी असे आवाहन विद्यार्थ्यांना केले या कार्यक्रमाचे निवेदन अशोक शितोळे यांनी केले
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि गुणवत्तावाढीसाठी रोटरी क्लबने उपलब्ध करून दिलेली ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार असून, या उपक्रमाबद्दल विद्यालयाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.
