भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत “स्वर दीपावली” मैफिल उत्साहात संपन्न—
स्वर दीपावलीतून रत्नागिरीकरांना सुरांची पर्वणी; अमोल बावडेकर, ईशानी पाटणकर यांच्या गायनाने रत्नागिरीकर झाले मंत्रमुग्ध—
👉🏻दीपावलीच्या मंगलमय पर्वावर भारतीय जनता पार्टीच्या पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर दीपावली’ या संगीतमय कार्यक्रमाने रत्नागिरीकरांना सुरांची अविस्मरणीय मेजवानी दिली. स्व. वि. दा. सावरकर नाट्यगृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते कलेची देवता नटराज यांना वंदन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व रसिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
➡️ सुरांनी उजळली संध्याकाळ
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले प्रसिद्ध अभिनेते व गायक अमोल बावडेकर आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम, रत्नागिरीची सुकन्या, प्रसिद्ध पार्श्वगायिका ईशानी पाटणकर यांची सुरेल जुगलबंदी. अभंग, भक्तिगीत आणि अजरामर भावगीतांच्या सादरीकरणाने दोन्ही कलाकारांनी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. अनेक गाण्यांना प्रेक्षकांकडून ‘वन्स मोअर’ ची मागणी झाली, यावरून कार्यक्रमाची रंगत लक्षात येते. संपूर्ण सभागृह भक्तिरस आणि सुरांच्या वर्षावाने भारावून गेले होते.
पावस येथील देसाई बंधू आंबेवाले प्रस्तुत आणि विनामूल्य प्रवेश असलेल्या या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून प्रतिसाद दिला. स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देतानाच आपली सांस्कृतिक परंपरा जपण्याचा सुंदर प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. विलास पाटणे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, मनोज पाटणकर, निलेश आखाडे, अजिंक्य केसरकर,अद्वैत कुलकर्णी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि संगीतप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
