🔴राजापूर अर्बन बँकेने डिजिटल युगात नवी क्रांती घडवावी; आधुनिक बँकिंगच्या दिशेने पुढील टप्पा गाठावा – आमदार किरण सामंत
🔴आमदार किरण सामंत यांच्या हस्ते राजापूर अर्बन बँकेच्या QR कोड सेवेचे उत्साहात अनावरण; ग्राहकांनी डिजिटल सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन.
-राजापूर : सहकार क्षेत्रात आपल्या विश्वासार्हतेचा ठसा उमटवणाऱ्या राजापूर अर्बन बँकेने १०६ वर्षांची गौरवशाली परंपरा जपत आता आधुनिक डिजिटल बँकिंगच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. बँकेच्या वतीने ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या QR कोड सेवेचे अनावरण आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार किरण सामंत यांनी राजापूर अर्बन बँकेच्या १०६ वर्षांच्या वाटचालीचे कौतुक करताना बँकेने बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून डिजिटल बँकिंग क्षेत्रात नवी क्रांती घडवावी, असे आवाहन केले.ते म्हणाले की, १०६ वर्षांची परंपरा असणे ही कोणत्याही बँकेसाठी अभिमानाची बाब आहे. एवढ्या प्रदीर्घ काळात ग्राहकांचा विश्वास संपादन करून बँकेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, काळानुसार बँकिंग क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. आजचे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे युग असून ग्राहकांनाही जलद, सुरक्षित आणि सुलभ बँकिंग सेवा अपेक्षित आहेत. त्यामुळे राजापूर अर्बन बँकेने आपल्या परंपरेचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढील टप्पा गाठावा.
QR कोड सुविधेमुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभ आणि सोयीस्कर पद्धतीने करता येणार आहेत. रोख रकमेवरील अवलंबित्व कमी करून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बँकेच्या सर्व ग्राहकांनी या नव्या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि डिजिटल बँकिंगचा स्वीकार करावा, असे आवाहनही आमदार सामंत यांनी केले.
राजापूर अर्बन बँकेने गेल्या १०६ वर्षांत सहकार क्षेत्रात आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. स्थानिक व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम बँकेने केले आहे. आता QR कोड सुविधेच्या माध्यमातून बँक आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करीत असून ग्राहकांना अधिक सक्षम सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे.
बँकेच्या या डिजिटल उपक्रमामुळे ग्राहकांचा वेळ वाचण्यास मदत होणार असून दैनंदिन आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतील. सहकार क्षेत्रातील पारंपरिक विश्वास आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून राजापूर अर्बन बँकेने भविष्यातही प्रगतीची नवी शिखरे गाठावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.१०६ वर्षांची विश्वासार्ह परंपरा आणि डिजिटल युगातील आधुनिकतेची नवी दिशा, असा राजापूर अर्बन बँकेचा हा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे. बँकेने भविष्यात आणखी प्रगती करून ग्राहकांच्या विश्वासाला अधिक बळ द्यावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी उपजिल्हा प्रमुख अशपाक हाजु, तालुका प्रमुख दीपक नागाळे, बँकेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार, उपाध्यक्ष विवेक गाडीकर, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, उपसभापती अभिजित गुरव,मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार आयरे, अनिलकुमार करगुंठकर, सर्व संचालक मंडळ, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सर्व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते
