सावर्डे विद्यालयात रस्ता सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन

0
8

सावर्डे विद्यालयात रस्ता सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि रस्ता ओलांडण्याच्या सुरक्षित पद्धतींचे प्रात्यक्षिकासह धडे
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक दादासाहेब पांढरे आणि प्रशांत सकपाळ यांनी सकाळ व दुपार सत्रातील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची सविस्तर माहिती दिली. रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, वाहन चालविताना पाळावयाचे नियम, रस्त्यावरील विविध वाहतूक चिन्हांचे अर्थ, चारचाकी वाहन चालविताना आवश्यक असलेली खबरदारी, वैध वाहनचालक परवाना आणि वाहन चालविताना आवश्यक असणारी कागदपत्रे यांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
इयत्ता नववीतील महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनाही वाहतुकीचे नियम आणि अंतर्गत सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम समजावून सांगितले. रस्ता ओलांडताना कोणती खबरदारी घ्यावी, वाहतूक चिन्हांचे पालन का आवश्यक आहे आणि रस्त्यावर सुरक्षितपणे वावरताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी, याचे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण करण्यात आले.
‘वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम उपयुक्त ठरला. रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करून विद्यार्थ्यांनी स्वतः सुरक्षित राहण्याबरोबरच इतरांनाही सुरक्षिततेचे महत्त्व पटवून द्यावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक शिक्षक भानुदास चव्हाण यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here