कन्यारक्षणाचा निर्धार:’बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

0
6

कन्यारक्षणाचा निर्धार:’बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत कायदेविषयक कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी, (जिमाका): मुलींचे अस्तित्व, शिक्षण आणि सुरक्षितता यांवर समाजाचे भवितव्य अवलंबून असून, गर्भलिंग निवडीसारख्या अनिष्ट प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम करणे काळाची गरज आहे, असा सूर माळनाका येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात उमटला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, गर्भवती महिलांशी संबंधित सेवा देणारे घटक आणि आशा सेविकांसाठी आयोजित विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळा पार पडली.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या विधी सल्लागार अनविक्षा पावसकर यांनी या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी गर्भलिंग निदान प्रतिबंधक (PCPNDT) कायद्यातील कठोर तरतुदी, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कारवाई याविषयी माहिती दिली. यासोबतच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या ‘पोक्सो’ (POCSO) कायद्याचे स्वरूप, बालकांचे हक्क आणि अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये प्रशासकीय व आरोग्य यंत्रणांनी तत्परतेने पार पाडायच्या जबाबदाऱ्या यावर प्रकाश टाकत उपस्थित कर्मचाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना, “गर्भवती महिलांची नोंदणी आणि आरोग्य तपासणी करताना कायद्याच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन व्हावे. मुलींच्या जन्माचे स्वागत करणारी सकारात्मक मानसिकता समाजात निर्माण करण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानता रुजविण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटकाने सजग राहावे,” असे आवाहन केले.
कार्यशाळेत महिला व बाल विकास विभागाच्या लोककल्याणकारी योजना, पीडित महिला व बालकांच्या मदतीसाठी २४ तास कार्यरत असणारी चाइल्ड हेल्पलाइन, सखी वन स्टॉप सेंटरची कार्यपद्धती आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या पद्धतींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महिला व बालकांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी विविध विभागांमधील परस्पर समन्वय किती निर्णायक ठरतो, हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेला जिल्हा संरक्षण अधिकारी लहू पगडे, चाइल्ड हेल्पलाइन प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक अश्विनी मोरे, महिला सक्षमीकरण विभागाच्या श्रद्धा गांधी यांच्यासह आरोग्य कर्मचारी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here