यादवराव घाग प्रतिष्ठानतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका संच 225 विद्यार्थ्यांना भेट

0
6

यादवराव घाग प्रतिष्ठानतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका संच 225 विद्यार्थ्यांना भेट

सावर्डे : विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा, या उद्देशाने यादवराव घाग प्रतिष्ठानतर्फे सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका संच सप्रेम भेट देण्यात आला.
सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी हा संच विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे व उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
यादवराव घाग प्रतिष्ठान गेल्या दोन दशकांपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध व्हावीत आणि त्यांना परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक वीरधवल घाग, उपाध्यक्ष रविंद्र घाग, प्रा. संतोषराव घाग, सरचिटणीस ॲड. उमेशराव घाग, सरचिटणीस अनिलराव घाग, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये अनन्यसाधारण बौद्धिक क्षमता आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना आजही आधुनिक शैक्षणिक सुविधा सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये आणि आपण ग्रामीण भागात शिक्षण घेताना ज्या अडचणींचा सामना केला, त्या अडचणी विद्यार्थ्यांना येऊ नयेत, या उदात्त हेतूने प्रश्नपत्रिका संच देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या गुणात्मक विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरधवल घाग यांनी केले.
गेल्या दोन दशकांपासून यादवराव घाग प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे कार्य सुरू आहे, असे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here