धामणीत आजही ग्रामस्थांच्या एकजुटीतून भात मळणीला मदतीचा हात;श्रमसंस्कृतीचे दर्शन!
संगमेश्वर :- संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे आजही पारंपरिक शेती संस्कृती आणि ग्रामस्थांमधील एकोपा जपला जात आहे. धामणी येथील भालचंद्र सप्रे यांच्या शेतात गेली अनेक वर्षे वडिलोपार्जित पद्धतीने भातशेती केली जात असून, आधुनिकतेच्या युगातही त्यांनी पारंपरिक शेतीची परंपरा कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे, भात कापणीपासून झोडणी आणि मळणीपर्यंतच्या कामांमध्ये ग्रामस्थ एकत्र येऊन एकमेकांना मदतीचा हात देत असल्याने ग्रामीण भागातील श्रमसंस्कृतीचे सुंदर दर्शन घडत आहे.
यंदा पावसाने काहीशी उसंती घेतल्याने शेतकऱ्यांनी भात झोडणी आणि मळणीच्या कामांना सुरुवात केली आहे. भालचंद्र सप्रे यांच्या शेतातही सध्या भात मळणीची लगबग सुरू असून, या कामासाठी गावातील ग्रामस्थ एकत्र येत आहेत. एकमेकांच्या शेतातील कामे सामूहिकरीत्या पूर्ण करण्याची जुनी पद्धत आजही येथे जिवंत आहे.
पूर्वीच्या काळात शेतीची कामे ही केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसत. गावातील प्रत्येक कुटुंब एकमेकांच्या मदतीला धावून जात असे. भात लावणी, कापणी, झोडणी आणि मळणी अशा प्रत्येक टप्प्यावर ग्रामस्थ एकत्र काम करत असत. यामुळे कामाचा ताण कमी होण्याबरोबरच गावातील सामाजिक नातेसंबंधही अधिक घट्ट होत असत. धामणीतील ग्रामस्थांनी आजही ही परंपरा जपली आहे.
श्री भालचंद्र सप्रे हे वडिलोपार्जित शेतीची परंपरा पुढे नेत असून, पारंपरिक पद्धतीने भातशेती करण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. बदलत्या काळात शेतीच्या पद्धती बदलत असल्या, तरी आपल्या पूर्वजांनी जपलेली शेती संस्कृती आणि ग्रामस्थांमधील सहकार्याची भावना टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचे या उपक्रमातून दिसून येत आहे.
धामणीतील हे चित्र केवळ भात मळणीचे नसून, गावकी, एकोपा, परस्पर सहकार्य आणि ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपणारे आहे. नव्या पिढीपर्यंत ही परंपरा पोहोचावी, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
