शाहू महाराजांचा विचार जिवंत ठेवणं ही काळजी गरज: अभिजित हेगशेट्ये
नवनिर्माण शिक्षण संस्थेत शाहू महाराज जयंती साजरी
रत्नागिरी : “सामाजिक न्याय व समानता निर्माण करण्यासाठी आणि दुर्बलांचे सशक्तीकरण करण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या शाहू महाराजांचे कार्य काळाचे पुढचे होते.आजच्या आधुनिक काळातही त्यांच्या विचारांची आणि कार्याची देशाला मोठी गरज आहे. त्यांचे कार्य केवळ पुस्तकात न ठेवता ते आपण आपल्या आचरणात आणले पाहिजे, त्यांचे विचार जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत ते पोहचवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल”, असे प्रतिपादन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी केले. एस पी हेगशेट्ये वरिष्ठ आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक क्रांती बद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी इतिहासप्रसिद्ध ‘वेदोक्त प्रकरणावर’ सविस्तर प्रकाश टाकला. प्राचार्य म्हणाले, “वेदोक्त प्रकरण हे केवळ धार्मिक वाद नव्हता, तर ती तत्कालीन सामाजिक विषमतेविरुद्ध शाहू महाराजांनी पुकारलेली मोठी क्रांती होती. त्यांनी पुरोगामी विचारांची कास धरून समाजातील जातिभेद नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा हा लढा आजच्या तरुण पिढीने समजून घेणे गरजेचे आहे.”
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांनी शाहू महाराजांनी वसतीगृहे बांधून, शिक्षण मोफत आणि सक्तीचे करून काय सामाजिक क्रांती केली आणि त्यांनी सुरू केलेल्या आरक्षणाचे महत्त्व काय होते याची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे एन एस एस प्रमुख प्रा. सुशील साळवी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी कांबळे यांनी केले, तर प्रा. निकिता नलावडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, विविध विभागप्रमुख आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
