सावर्डे विद्यालयात पालक संवाद सभा उत्साहात संपन्न ,शिक्षक व पालकांच्या सहकार्याने संस्कारक्षम...

सावर्डे विद्यालयात पालक संवाद सभा उत्साहात संपन्न ,शिक्षक व पालकांच्या सहकार्याने संस्कारक्षम विद्यार्थी घडवूया – प्राचार्य राजेंद्र वारे

सावर्डे विद्यालयात पालक संवाद सभा उत्साहात संपन्न
शिक्षक व पालकांच्या सहकार्याने संस्कारक्षम विद्यार्थी घडवूया – प्राचार्य राजेंद्र वारे

सावर्डे, ता. चिपळूण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्ञानार्जनाबरोबरच कौटुंबिक जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि सुसंस्कार यांचा संगम असलेला विद्यार्थीच भविष्यात यशस्वी ठरतो. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या विविध शैक्षणिक सुविधा आणि संधींचा योग्य उपयोग करून संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे नुकतीच पालक संवाद सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला तब्बल ६९२ पालकांची उपस्थिती लाभली.

सभेच्या प्रारंभी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अशोक शितोळे यांनी प्रास्ताविक करताना पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संघटित प्रयत्नातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साध्य होऊ शकतो याची माहिती दिली. यावेळी त्यांनी विद्यालयाने गेल्या काही वर्षांत प्राप्त केलेल्या विविध यशांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” अभियानाच्या टप्पा क्रमांक १, २ व ३ मध्ये विभागस्तरावर प्रथम क्रमांक, गांधी तीर्थ जळगाव यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय “स्वच्छ शाळा सुंदर शाळा” स्पर्धेतील प्रथम क्रमांक, राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी, तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांतील यश, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांतील उल्लेखनीय यशाची माहिती पालकांना दिली.

विद्यालयाचे पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांनी पालकांची भूमिका, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत कुटुंबाचे महत्त्व आणि विद्यालयातील विविध उपक्रमांविषयी सविस्तर विवेचन केले. उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी शालेय परीक्षा, त्यांचे नियोजन, अतिरिक्त सराव परीक्षा, अभ्यासाचे वेळापत्रक आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती पालकांना दिली.

प्राचार्य राजेंद्र वारे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थी सुरक्षा, रस्ते व वाहतूक नियमांचे पालन, शालेय शिस्त, शालेय गणवेशाचे महत्त्व, बसने प्रवास करताना घ्यावयाची काळजी, पालकांची जबाबदारी, विद्यार्थिनींसाठी उपलब्ध तक्रारपेटी, विद्यालयातील अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा, अतिरिक्त तास व सराव चाचण्या, विविध स्पर्धा परीक्षा तसेच त्यासाठी आवश्यक दाखले याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच वाचन व लेखन कौशल्यात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी घर, शाळा, समाज, मित्रपरिवार आणि परिसरातील विविध घटकांचे योगदान कसे महत्त्वाचे असते याची उदाहरणांसह माहिती देत त्यांनी पालकांनी विद्यार्थ्यांबाबत सतर्क व सजग राहण्याचे आवाहन केले.

सभेदरम्यान विद्यालयात सुरू असलेल्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांविषयी तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले. याच सभेत पालक-शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन समितीची गठिती करण्यात आली. सदर सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वर्षा चव्हाण व स्फूर्ती जाधव यांनी विशेष सहकार्य केले

पालक सभा यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता सुधीर कदम यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

Breaking News

रत्नागिरी येथील एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी येथील एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये...

भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन’ उत्साहात साजरा

*भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये 'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' उत्साहात...