राजापूर चे नाव उज्ज्वल करीत एनएमएमएस’ परीक्षेत अक्सा खलिफे हिने उर्दू माध्यमातून जिल्ह्यात प्रथम येण्याचा पटकाविला मान—
👉 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ( N.M.M.S.) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला . या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील नवजीवन हायस्कूलची विद्यार्थीनी कुमारी अक्सा वसिम खलिफे हिने नेत्रदीपक यश संपादन केले आहे . अक्साने उर्दू माध्यमातून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून आपल्या प्रशालेचा आणि राजापूर शहराचा नावलोकीक वाढवला आहे.
मेहमत आणि चिकाटीचे हे फळ आहे – NMMS परीक्षा ही इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक मानली जाते . अक्साने आपल्या जिद्द चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील आणि उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणा- या या विद्यार्थीनीने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे .
शिष्यवृत्तीसाठी पात्र – जिल्ह्यात प्रथम क्रमांकासह उत्तीर्ण झाल्यामुळे अक्सा आता केंद्र सरकारकडून मिळणा-या राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे . अक्साच्या या यशाने तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यशामध्ये शिक्षक आणि पालकांचा वाटा – आपल्या या यशाचे श्रेय अक्साने नवजीवन हायस्कूलमधील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांनी दिलेल्या पाठिंब्याला दिले आहे . शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षक वृंदाने अक्साचे अभिनंदन करुन तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
NMMS परीक्षेचे महत्व – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र सरकारतर्फे ही परीक्षा घेतली जाते . या परीक्षेत उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी 12 वी पर्यंत दरमहा ठरावीक रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते . अक्साने मिळवलेल्या या यशामुळे उर्दू माध्यमाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे…
