रत्नागिरीजलसंधारणाची मोठी लोकचळवळ: लाजूळ, विले आणि मालगुंड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही...

जलसंधारणाची मोठी लोकचळवळ: लाजूळ, विले आणि मालगुंड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे श्रमदान

जलसंधारणाची मोठी लोकचळवळ: लाजूळ, विले आणि मालगुंड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे श्रमदान; उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारे सज्ज
रत्नागिरी, (जिमाका): लाजूळ, विले आणि मालगुंड येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी हातात हात घालून केलेल्या उत्स्फूर्त श्रमदानातून वनराई बंधारे उभारण्यात आले. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईला वेळीच पायबंद घालण्यासाठी आणि भूजल पातळी उंचावून संपूर्ण परिसर सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली असून, लाजूळ, विले आणि मालगुंड येथील या लोकसहभागामुळे मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात ही व्यापक जलसंधारण मोहीम वेगाने राबवली जात आहे. गावाचा पाण्याचा प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी हे बंधारे अत्यंत मोलाचे ठरणार आहेत. वाहून जाणारे पाणी अडवल्यामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या (बोअरवेल) पाणीपातळीत लक्षणीय वाढ होणार असून, ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांसह शेती आणि मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत होणार आहे.
या मोहिमेच्या यशस्वी नियोजनात आणि अंमलबजावणीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सागर पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) मल्लिनाथ कांबळे तसेच गट विकास अधिकारी चेतन शेळके यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
प्रत्यक्ष जागेवर बंधारे उभारणीचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता अमोल दाभोळकर, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, पंचायत समिती विस्तार अधिकारी (कृषी) अंकुर कांबळे, नारायण पवार, लाजूळचे प्रशासक श्री. खेडकर आणि ग्रामपंचायत अधिकारी सुशांत लोंढे यांनीही विशेष परिश्रम घेतले.
प्रशासकीय यंत्रणेची तत्परता, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि ग्रामस्थांचे श्रमदान या त्रिसूत्रीतून आकारास आलेल्या या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातून जोरदार स्वागत व कौतुक होत आहे.

Breaking News

सावर्डे विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत मातीकाम कला विश्व

सावर्डे विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत मातीकाम कला विश्व५ वी...